भुसावळातील 13 वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू
भुसावळ : शहरातील मूळ रहिवासी व हल्ली औरंगाबाद स्थित असलेल्या 13 वर्षीय मुलाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यज्ञेश वसंत पाटील (13, गंगाराम प्लॉट, भुसावळ, ह.मु.अलका नगर हौसींग सोसायटी, हुडको, औरंगाबाद) असे मयत बालकाचे नाव आहे. यज्ञेश आजारी पडल्यानंतर त्याच्यावर औरंगाबाद येथील निमाय रुग्णालयात व नंतर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यास डेंग्यूचे निदान झाले. उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी मृत्यू झाला. मयत यज्ञेशवर मूळगावी भुसावळ येथे गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत यज्ञेश हा भुसावळातील दामोदर बाबूराव पाटील यांचा नातू तर किरण पाटील व महेश पाटील यांचा पुतण्या होय. दरम्यान, मयत हा औरंगाबादचा रहिवासी असून या कुटुंबातील वडील वसंत पाटील, आई पूनम पाटील व बहिण सई पाटील यांना कुठलाही त्रास जाणवत नसल्याचे भुसावळ पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी सांगितले.





