ट्रक ओनर्स असोसिएशनचा 1 सप्टेंबरपासून चक्का जामचा इशारा
केळी भाड्यातून हमाली कापण्याची पद्धत बंद करण्याची ट्रक ओनर्स असो.ची मागणी
सावदा : शहरात रविवारी दुपारी तालुका ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे छोटेखानी मोर्चा काढण्यात आला. यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रक चालक, ट्रान्सपोर्ट चालक विरुद्ध केळी व्यापारी यांच्या वादाच्या पार्श्वभूमी असून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली गाडी भाड्यातून हमाली कापण्याची रीत असून ती बंद व्हावी, अशी ट्रक चालक व मालक यांची मागणी आहे मात्र केळी व्यापारी ही प्रथा पूर्वीपासून असून ती रीत आहे, ती तशीच राहील अशी भूमिका मांडल्याने या भूमिकेविरोधात 1 सप्टेंबरपासून सावद्यातील भरल्या जाणार्या केळीच्या गाड्या भरण्यात येणार नाही व चक्का जाम केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला.
गाडी भरल्यास दंडाचा इशारा
रावेर-यावल तालुका ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे 1 सप्टेंबरपासून चक्का जाम आंदोलन इशारा दिल्यानंतर कुणीही वाहनधारकाने गाडीी भरल्यास त्यास 50 हजारांचा दंड करण्याचा इशारा देण्यात आला आहे या निर्णयामुळे मात्र केळी माल वाहतुकीवर परीणाम होणार असून शेतकरी संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. ट्रक बंद राहिल्यास केळी परप्रांतात जाणार नाही व त्यांचे परीणाम भावावर होऊन केळी उत्पादकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. सावदा शहरातून दररोज 200 ते 300 ट्रक माल दररोज परप्रांतात रवाना होतो मात्र या निर्णयामुळे त्यास ब्रेक लागणार असून अर्थचक्र देखील थांबणार आहे.




