संतापजनक : फेरीवाल्याच्या हल्ल्यात महापालिका सहा.आयुक्तांची बोटे तुटली
ठाणे : कासारवडवली भागातील मार्केट परीसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी अमरजीत यादव असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास न्यायालयाने 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीला पोलिसांकडून अटक
हा हल्ला करणार्या फेरीवाल्यास पोलिसांनी अटक केली असून अमरजीत यादव असे त्याचे नाव आहे. सोमवारी पिंपळे यांचे पथक घोडबंदरच्या कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणार्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले होते. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही कारवाई सुरू होती. त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतानाच संतप्त झालेल्या यादव याने रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून खाली पडली.



गाडी जप्त केल्यानेच हल्ला
यावेळी येथील स्थानिक नागरिक आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी यादव याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु, पोलीस आपल्याला पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे समजताच त्याने तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळ चालणार्या या थरारनाट्यानंतर त्याला शिताफीने पकडून कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याची गाडी जप्त केल्यानेच राग मनात धरून त्याने हा हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज आता वर्तविण्यात आला आहे.


