राजू शेट्टींबाबत शरद पवारांचे मोठे विधान ; म्हणाले आम्ही शब्द पाळला


पुणे : विधान परीषदेत नियुक्त 12 आमदारांच्या यादीला अद्याप राज्यपालांकडून मंजुरी मिळाली नसताना अलीकडे या यादीवरून नवा संभ्रम निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्याचे म्हटले जात आहे. याबाबत पुण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, ते नाराज असतील, तर त्याबाबत काही म्हणायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी यादी राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने दिली आहे, त्यात राजू शेट्टी यांचे नाव आहे.

आम्ही आमचे प्रामाणिकपणे काम केले
शरद पवार म्हणाले की, राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते लक्षात घेऊन त्यांना विधान परीषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की, अशा प्रकारची विधाने कशी केली जातात. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणाने केले आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केले त्यावर भाष्य करायचे नाही. दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.




राजू शेट्टी म्हणाले ; तर करेक्ट कार्यक्रम करेन
आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की, नाही पाळायचा की, पाठीत खंजीर खुपसायचा, कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचे आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशारा राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !