नंदुरबार जिल्हा पोलिस दलात मोठा फेरबदल : सहा पोलीस निरीक्षकांसह 12 अधिकार्यांच्या बदल्या
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश : दोन अधिकार्यांच्या विनंती बदल्या
गणेश वाघ
Major reshuffle in Nandurbar District Police Force: 12 officers, including six Police Inspectors, transferred. भुसावळ (20 जून 2026) : नंदुरबार जिल्हा पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. तब्बल 12 पोलीस पोलीस अधिकारर्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी काढले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बदली झालेल्यांमध्ये सहा निरीक्षक, दोन सहा.निरीक्षक व चार उपनिरीक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, दोन अधिकार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.
कायदा-सुव्यवस्था अधिक होणार प्रभावी
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने तसेच प्रशासकीय कारणास्तव विविध पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष व शाखांमधील अधिकार्यांची नव्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये नंदुरबार शहर, धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, तळोदा, उपनगर, सायबर पोलीस ठाणे तसेच नियंत्रण कक्षातील तीन निरीक्षकंचा समावेश आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार संबंधित अधिकार्यांनी तात्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होऊन त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजात अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



सहा निरीक्षकांना मिळाली प्रभारीपदी नियुक्ती
नियंत्रण कक्षातील संदीप भटू पाटील यांना शहर पोलीस ठाण्यात तर नियंत्रण कक्षातील सुनील भानुदास भाबडे यांना धडगाव ठाण्यात नियुक्ती मिळाली. नियंत्रण कक्षात अर्जुन अब्बास पटेल यांना अक्कलकुवा ठाण्यात तर सायबरचे अमोल वामनराव सातोदकर यांना उपनगर ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले. अक्कलकुव्याचे सारंगधर वासुदेव नवलकर यांची नियंत्रण कक्षात तर धडगावचे राजेंद्र हिराचंद जगताप यांची सायबर ठाण्यात बदली करण्यात आली.
दोन सहाय्यक निरीक्षकांसह चार उपनिरीक्षकांची बदली
उपनगरचे सहाय्यक निरीक्षक संजोग कैलास बच्छाव यांची जिविशा शाखेत तर नियंत्रण कक्षाचे नरेंद्र विनायक बैसाणे यांची उपनगर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे नवापूरचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांची धडगाव येथे, सारंगखेड्याचे किरण बार्हे यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली, मोलगीचे सागर गाडीलोहार यांची नवापूर येथे तर तळोद्याचे महेश निकम यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली.
दोन उपनिरीक्षकांची विनंती बदली
नंदुरबार नियंत्रण कक्षातील अमोल कडूबा देशमुख यांना नंदुरबार शहर ठाण्यात तर नियंत्रण कक्षातील योगीता गबरू राठोड यांना डायल 112, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

