यावल तालुक्यातील कोळन्हावीतील तरुणाची हत्या : तीन आरोपींना अटक

हत्येनंतर केला अपघाताचा केला बनाव : यावल पोलिसांनी उकलले खुनाचे गुढ


Murder of a youth from Kolnhavi in ​​Yaval Taluka : Three accused arrested यावल (20 जून 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी ते डांभुर्णी या रस्त्यादरम्यान बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोळन्हावीतील 26 वर्षीय तरुण ठार झाला होता व अज्ञात चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यावल पोलिसांच्या तपासात तरुणाचा मृत्यू अपघाताने नव्हे तर खुनाने झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना अटक केली आहे. पवन रवींद्र सोळंके (26, कोळन्हावी, ता.यावल) असे खून झालेल्या तरुणाचे तर उमेश दिलीप परदेशी (32, रा.कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी (32, रा.डांभूर्णी) व लोकेश दिवाकर महाजन (32, रा.डांभूर्णी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?
कोळन्हावी, ता.यावल येथील रहिवाशी पवन रवींद्र सोळंके (26) या तरुणाला बुधवारी मध्यरात्रीनंतर तीन तरुण दुचाकीवर घेऊन ग्रामीण रुग्णालयात आले व त्यांनी अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. या प्रकरणी एका संशयीताच्या तक्रारीद्वारे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.




तपासात खून झाल्याचे उघड
यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, क्राईम राईटर वासुदेव मराठे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अपघात झाला नसल्याचे स्पष्ट झाले तर संशयीतांनी दिलेल्या कबुलीनुसार उमेश दिलीप परदेशी (32, रा.कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी (32, रा.डांभूर्णी) व लोकेश दिवाकर महाजन (32, रा.डांभूर्णी) या तिघांनी मयतासह बुधवारी रात्री पार्टी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे दोन अन्य मित्र होते. मयतासह सहा जणांनी हे शेतात पार्टी केल्यानंतर यातील दोन मित्र एक उंटावद आणि एक कोळन्हावी येथे आपल्या घरी परतले मात्र मयत पवन व उमेश परदेशी, चेतन कोळी, लोकेश महाजन हे पार्टी संपल्यानंतर देखील किनगाव येथे एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले व नंतर ते किनगाव ते डांभुर्णी दरम्यान असलेल्या पाटचारीवर गेले आणि तेथे त्यांनी पवनशी वाद घालून त्याला मारहाण केली आणि मध्यरात्रीनंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
संशयीतांनी दाखवलेल्या घटनास्थळाचा फॉरेन्सीक टीमने बारकाईने पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी डीवायएसपीसह सर्व पथक दाखल झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीदेखील यावेळी पोलीस ठाण्यात भेट दिली. या प्रकरणी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !