चारीत्र्याच्या संशयातून पत्नीचा केला खून ; नंतर स्वतःलाही संपवले
शिरूर अनतपाळ (जि.लातूर) : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत पतीने पत्नीशी भांडण केले. या भांडणातच पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीनेही गळफास घेतला. ही घटना शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे शनिवारी रात्री घडली. रविवारी शिरूर अनंतपाळ पोलिसांना घटना कळताच त्यांनी धाव घेतली. मनीषा सिद्धेश्वर शिंदे (32) असे खून झालेल्या महिलेचे तर सिद्धेश्वर राजेंद्र शिंदे (35) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
मारहाणीत झाला पत्नीचा मृत्यू
मयत मनिषा काही दिवसांपासून माहेरी होती. सिद्धेश्वर शिंदे याने पत्नीला रोकडा सावरगाव येथून शनिवारी साकोळ येथे आणले. घरी आल्यावर रात्री दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सिद्धेश्वर याने पत्नीला लाथा-बुक्क्यांनी ोरात मारहाण केली त्यातच तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यानेही स्वत: गळफास घेऊन घरातच आत्महत्या केली. पती, पत्नीच्या मृतदेहाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर नातेवाईकांना प्रेत ताब्यात देण्यात आले. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी, तपघाले, तुमकुटे करीत आहेत.
