चारीत्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची पतीकडून हत्या
पिंपरी : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत तलाठीने पतीने पत्नीचा खून केला. बोर्हाडेवाडी, मोशी येथे सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. सरला विजय साळवे (32), असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पती तथा तलाठी विजयकुमार साळवे (35, रा. बोर्हाडेवाडी, मोशी) हा खून करून पसार झाला आहे. आरोपीविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दाम्पत्याचा प्रेमविवाह
सरला व विजय यांचा 2019 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मयत सरला ही पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या तर आरोपी विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगावात तलाठी आहे. मयत सरला आणि तिचा आरोपी पती विजयकुमार यांनी बोर्हाडेवाडी, मोशी येथे फ्लॅट खरेदी केला. नवीन फ्लॅटची शनिवार, 4 सप्टेंबर रोजी वास्तूशांती झझाली होती. त्यानंतर सरला व विजयकुमार हे दोघेही तेथेच मुक्कामी थांबले. मात्र त्या दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे त्यांच्या नातेवाईक व मित्रांच्या निदर्शनास आले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर पोलिसांनी प्लॅट उघडून पाहिला असता त्यात सरला जखमी अवस्थेत आढळल्या. त्यांना पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळावर ती मला साथ देत नव्हती, त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा, अशा आशयाचा मजकूर लिहिलेली आरोपीची चिठ्ठी सापडली आहे.




