लाच भोवली : सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
मिरज : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वसंत बिले (42, मूळ गाव खोमनाळ, ता.मंगळवेढा, जि. सोलापूर, सध्या रा.पोलीस कर्मचारी वसाहत, पंढरपूर रस्ता, मिरज) यांना 25 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली. बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्ह्यात मिरजेतील डॉक्टरांना आरोपी न करण्यासाठी बिले यांनी लाच मागितल्याने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
सहआरोपी न करण्यासाठी मागितली लाच
तीन वर्षांपूर्वी बेडग (ता. मिरज) येथे एकाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. तिचा गर्भपात करून पोलिसांना माहिती न दिल्याने मिरजेतील दोन डॉक्टरांनाही आरोपी करण्याची मागणी समाधान बिले याने न्यायालयाकडे केली होती. दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी यापैकी एका डॉक्टरांकडे बिले याने एक लाखाची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीने 25 हजारात प्रकरण मिटविण्याचे ठरले होते. जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने त्याची खात्री करून सापळा लावला. बुधवारी रात्री सातच्या दरम्यान मिरजेत हिरा हॉटेल चौकात रुईकर यांच्याकडून 25 हजार रुपये लाच घेतल्यानंतर बिले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करुन बिले यास अटक करण्यात आली.




