32 वर्षीय इसमाची बंदुकीच्या गोळ्या झाडत हत्या
वाशिम : पांगरी कुटे (ता.मालेगाव) गावानजीक 32 वर्षीय इसमाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रविवार, 12 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह अधिकार्यांनी भेट देऊन तपास सुरू केला. दरम्यान, मृतक अनोळखी असल्याने या घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पांगरीकुटे शेत शिवारात स्त्यालगतच्या एका शेतात अंदाजे 33 वर्षीय इसमाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती मालेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आपल्या ताफ्यासह ठाणेदार धुमाळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ व मृतदेहाची पाहणी केली असता, मृतकाच्या कपाळावर आणि छातीत बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. मृतक अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ही हत्या का, कधी व कुणी केली, हत्येमागील कारणांचा उलगडा करण्याकामी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
