अरे देवा ! : टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने घासले दात : मुलीचा मृत्यू
मुंबई : टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुंबईतील धारावी भागातील अफसाना खान (18) या मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी अफसाना हिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण विष तिच्या शरीरात पसरल्याचं डॉक्टरांनी उपचारादरम्यान सांगितलं. रविवारी संध्याकाळी तिचं निधन झालं. अफसानाच्या कुटुंबात तिची आई, दोन वर्षांनी मोठी एक बहिण आणि दोन लहान भाऊ असा परिवार आहे.
चुकून दातांना घासले औषध
मृत पावलेली 18 वर्षीय अफसाना खान मुंबईतील धारावीत वास्तव्यास होती. शुक्रवारी सकाळी ती जेव्हा झोपेतून उठली तेव्हा नेहमीप्रमाणं ती दात घासण्यासाठी वॉशरुममध्ये गेली. झोप पूर्ण न झाल्याने गडबडीत उंदीर मारण्याच्या औषधाची पेस्ट तिनं चुकून टूथपेस्ट समजून ब्रशवर घेतली आणि ब्रश करण्यास सुरुवात केली. टूथपेस्टची चव वेगळीच लागल्यानं तिनं चूळ भरली खरी पण तोवर बराच उशीर झाला होता. तिच्या शरीरात विष पसरलं होतं. अफसानाला तातडीनं जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार देखील सुरू होते. पण दोन दिवसांच्या उपचारानंतर अफसाना हिचा मृत्यू झाला.
