मुंबईहून प्रयागराजकडे जाणार्या ट्रेनमधून शवपेटीतील मृतदेह गायब
मुंबई : प्रयागराज येथे नातेवाईकाचा मृतदेह रेल्वेने घेऊन जाणार्या मुंबईतील एका कुटुंबाला धक्का बसला. मुंबई-वाराणसी स्पेशल एक्स्प्रेसच्या गार्डच्या डब्यामध्ये ठेवलेल्या शवपेटीतून मृतदेह गायब झाल्याचे समजल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी प्रयागराज स्टेशनवर गोंधळ घातला. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील बरहुपूर गावातील एका महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह शवपेटीत ठेवून त्यांचे कुटुंबीय ट्रेनमधून उत्तर प्रदेश येथे जात होते. वाटेत मृतदेह शवपेटीतून गायब झाला. रात्री उशिरा ट्रेन प्रयागराज स्टेशनवर पोहोचली तेव्हा गार्डच्या डब्यामध्ये असलेल्या शवपेटीत मृतदेह सापडला नाही. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला.
महिलेच्या मृतदेह गायब झाल्याने खळबळ
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रतापगड पट्टी तहसील परिसरातील बरहुपूर येथील रहिवासी वहाब शेख यांच्या 56 वर्षीय पत्नी सरवारी बेगम गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. सरवरी यांची शेवटची इच्छा होती की त्यांना त्यांच्या गावाजवळ दफन करावे. सर्फराज, गुफ्रान, गल्फम आणि फरिन यांनी कुर्ला-वाराणसी फेस्टिवल स्पेशल ट्रेनने त्यांच्या आईचे पार्थिव नेण्यासाठी आरक्षण केले. मृतदेह शवपेटीत ठेवून तो पार्सलच्या डब्यात ठेवण्यात आला. कुटुंबिय ट्रेनसह दुसर्या डब्यातून प्रवास करत होते. रात्री अकरा वाजता ट्रेन प्रयागराज स्थानकावर पोहोचली तेव्हा ते गार्ड डब्यातून मृतदेह उतरवण्यासाठी गेले. बराच शोध घेऊनही त्यांना मृतदेह सापडला नाही.
