हसन मुश्रीफांविरोधातील कागदपत्रे प्राप्तीकर विभाग व ई.डी.कडे सादर
मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कर्हाड यांचीही भेट घेऊन त्यांनाही याप्रकरणी कारवाईच्या सूचना देण्याची विनंती केली.
मुश्रीफांवर 127 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला असून मुश्रीफ यांनी 100 कोटी रुपयांचा दावा न्यायालयात सादर करण्याचा इशारा दिला आहे. परीवहन मंत्री अनिल परब यांनीही सोमय्या यांना बदनामीबद्दल कायदेशीर नोटीस बजावली असून 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
पण त्याला मी किंमत देत नसून सहा नेत्यांनी अशा नोटिसा दिल्या असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. माझ्या मुलाला तुरुंगात पाठविण्याचा प्रयत्न झाला, पत्नी मेधा सोमय्यांच्या मागे चौकशी लावण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांनी केला. पण मी त्याला घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.



