डमी उमेदवार उभे करणार्‍या षडयंत्राचा पर्दाफाश : ‘नीट’ गैरव्यवहारात बडे मासे अडकण्याची शक्यता


नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ‘नीट’ परीक्षेत मूळ विद्यार्थ्यांच्या नावावर डमी उमेदवार उभे करणारे मोठे षडयंत्र उघडकीस आले आहे. यात नागपुरातील शिकवणी वर्गांचे नाव समोर आले आहे. येथील दोन शिकवणी वर्गांतून सी.बी.आय.च्या अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त केले असून ते घेऊन काही अधिकारी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. डमी उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा संशय 12 सप्टेंबरला देशभरात नीटची परीक्षा झाली. नीटमध्ये चांगले गुण मिळवून देणे आणि देशातील नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून सक्करदरा परिसरातील आर. के. एज्युकेशन अ‍ॅण्ड करिअर गाइडन्स आणि नंदनवन, गणेशनगर परीसरातील कॅरिअर पॉइंट या शिकवणी वर्गांच्या संचालकांनी 50 लाख रुपये घेतले. त्याकरिता वेगवेगळ्या रकमेचे भविष्यातील तारखेचे धनादेश घेण्यात आले व हमी म्हणून विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेसह महत्त्वाचे दस्तावेज त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतले. नागपूरमधील विद्यार्थ्यांचे बनावट आधारकार्ड आणि इतर दस्तावेज तयार करून त्यांना नीटसाठी दिल्लीतील परीक्षा केंद्र मिळवून देण्यात आले. या परीक्षा केंद्रांवर मूळ विद्यार्थ्यांऐवजी डमी उमेदवारांनी परीक्षा दिली. हा प्रकार सी.बी.आय.च्या लक्षात आला. दिल्लीतील सी.बी.आय.च्या अधिकार्‍यांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. यात दोन्ही शिकवणी वर्गांचे संचालक परिमल व अंकित यांचाही समावेश आहे. ते सध्या सी.बी.आय.च्या कोठडीत आहेत. यानंतर दिल्ली सी.बी.आय.च्या आदेशानुसार नागपूर सी.बी.आय.ने या दोन्ही शिकवणी वर्गांना टाळे ठोकून कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !