धक्कादायक ! : 2020 मध्ये भारतात दिवसाला 80 हत्या आणि 77 बलात्काराच्या घटना;
मुंबई : भारतात 2020 मध्ये दररोज सरासरी 80 खून आणि 77 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आली आहे. 2020 मध्ये दररोज सरासरी 80 हत्यांसह भारतात एकूण 29,193 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हत्येच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्या. 2019च्या तुलनेत 2020च्या आकडेवारीत 1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2019मध्ये दिवसाला सरासरी 79 हत्यांसह एकूण 28,915 जणांची हत्या झाली होती. 2020 मध्ये देशभरात सर्वाधिक 3 हजार 779 हत्येच्या घटनांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये नोंदवली गेली. त्यानंतर, 3,150 बिहारमध्ये आणि तिसर्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात 2,163 हत्या झाल्या आहेत. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 1,948 खुनाचे गुन्हे दाखल झाले. तसेच राजधानी दिल्लीत 2020 या वर्षभरात 472 खून झाले, असंही या आकडेवारीत म्हटलंय. 2020 मध्ये दररोज सरासरी 70 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली.
वर्षभरात बलात्काराच्या एकूण 28 हजार 46 घटना घडल्या
एन.सी.आर.बी.ने म्हटले आहे की, गेल्या वर्षी देशभरात महिलांविरोधील 3 लाख 71 हजार 503 गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवली गेली होती. 2019 च्या तुलनेत 2020मध्ये 8.3 टक्क्यांनी घट झाली आहे. 2019मध्ये महिलांविरोधातील 4 लाख 5 हजार 326 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. एन.सी.आर.बी.च्या आकडेवारीनुसार, 2020मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक 5,310 बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश 2,769, मध्य प्रदेश 2,339 आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 2,061 प्रकरणं नोंदवली गेली. 2019 मध्ये एक लाख महिला लोकसंख्यमागे गुन्ह्यांचं प्रमाण 62.3 टक्के होतं, तर हेच प्रमाण 2020मध्ये 56.5 टक्क्यांवर होतं.
