धक्कादायक ! : बस चालकाची बसमध्येच गळफास घेत आत्महत्या
संगमनेर : कर्जाला कंटाळून बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बस (क्र.एम. एच. 14, बी. टी. 4887) या पाथर्डी-नशिक बसमध्ये चालकाचा मृतदेह आढळला. संगमनेर बसस्थानकात ही घटना उघडकीस आली. सुभाष तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे मयत चालकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी सांगितले मात्र त्यामध्ये कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही सांगण्यात आले. बसचे वाहक पोपट साहेबा जावळे (पाथर्डी डेपो) यांनी पोलिसांना माहिती कळविली. पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या अन्य सहकार्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले. डेपोतून बाहेर पडताना ते पुढे निघाले. मी पुढे जातो, तुम्ही पाठीमागून या, असे त्यांनी सहकार्यांना सांगितले. थोड्यावेळाने वाहक जावळे बसमध्ये आले. त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला सुती दोरीच्या सहायाने तेलोरे यांनी गळफास लावून घेतला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. कुटुंबाकडे चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
