भुसावळातील तरुणाचा नशिराबादला खून
मयताचे वडील जखमी ; भुसावळातील दोघे हल्लेखोर जाळ्यात
नशिराबाद : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या धम्मप्रिय मनोहर सुरळकर (१९) या तरुणाचा चाकूचे वार करीत तसेच दोन गोळ्या झाडून खून करण्यात आला तर धम्मप्रियचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर (वय ४५, रा.पंचशील नगर, भुसावळ) हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी सात वाजता नशिराबाद महामार्गावरील सुनसगाव पुलानजीक ही घटना घडली. दरम्यान, दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जामिनावर सुटताच खून
गतवर्षी ११ ऑक्टोबर 2020 रोजी कैफ शेख जाकीर (17) या तरुणाचा पंचशील नगरात डोक्यात रॉड मारल्याने मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात पाच जणांना आरोपी करण्यात आले होते. हा खून धम्मप्रिय याने केल्याचा आरोप होता. मंगळवारी तो जामिनावर कारागृहातून बाहेर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघा संशयितांनी हल्ला चढवला. धम्मप्रिय व त्याचे वडील दोघे दुचाकीने घरी जात असताना सुनसगाव पुलाजवळ अचानक आलेल्या दोघांनी मिरची पूड डोळ्यात टाकली आणि धम्मप्रियवर चाकूने हल्ला चढवत गोळीबार केला तर मनोहर यांच्यावर चाकूने वार केले. यात धम्मप्रिय जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रात्री उशिरा दोघा संशयितांना नशिराबाद पोलिसांनी अटक केली.




