गिरणा धरणात 80 टक्के जलसाठा : तर होईल सलग तिसर्यांदा धरण भरण्याचा विक्रम
चाळीसगाव : चाळीसगाव वासीयांसाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणात संततधार पावसामुळे तब्बल 80 टक्के जलसाठा झाला असून धरण लवकरच भरण्याची आशा वर्तवली जात आहे. चाळीसगावसह तीन तालुक्यांना गिरणा धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणात मुबलक प्रमाणावर झालेल्या जलसाठ्यामुळे तीन तालुक्यातील पाणीप्रश्न मिटल्याने समाधान व्यक्त होत आहे. चाळीसगावसह भडगाव, पाचोरा व जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणार्या गिरणा धरणात नाशिक जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढत असून धरणात मंगळवारी 80 टक्के जलसाठा असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तर होईल सलग तिसर्यांदा धरण भरण्याचा विक्रम
सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 वेळा गिरणा धरण भरले असून आता शंभर टक्के जलसाठा झाल्यानंतर 11 वेळा धरण भरण्याचा विक्रम होईल तसेच सलग तिसर्यांदा धरण भरेल, असे सूत्रांनी सांगितले.








