माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेने पाच जण जखमी


मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांनी धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाल्याची घटना गडगा-मुखेड रोडवरील बेळी फाटा येथे रविवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडली. रविवारी देवेंद्र फडणवीस हे लातूर, नांदेडच्या दौर्‍यावर होते. बेरळी येथे राजे छत्रपती अकॅडमी जवळ ताफ्यातील वाहनाने एका पोलिसासह दोन मोटरसायकल आणि एका मालवाहू जीपला धडक दिली. जिवीत हानी झालेली नसली तरी पाच जणांनाही दुखापत झाली आहे. गडगा ते मुखेड जाताना अपघात झाला. बालाजी शंकर पवार (वय 26 रा.मांजरी, ता.मुखेड), राजेश व्यंकटराव जाधव (वय 36, रा.मुखेड), जमादार नामदेव सायबू दोसलवार, समीर भीसे (वय 37) व अरविंद मोरे (वय 40) अशी जखमींची नावे आहेत. बेरळी फाट्यावर हा अपघात झाला.

जखमींची केली विचारपूस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, खासदार प्रताप चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार राम रातोळीकर, माधवराव साठे, बालाजी बच्चेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !