मुलीच्या हत्येनंतर शिक्षक पित्याने मागितली एआयकडे मदत !
सातारा (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : सातारा जिल्ह्यातील गोडोली परिसरात जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीची हत्या केली. विशेष म्हणजे आरोपी हा पेशाने शिक्षक असून, शनिवारी रात्री घरातच त्याने मुलीवर जीवघेणा हल्ला केला. हत्या केल्यानंतर घाबरलेल्या आरोपीने गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आणि पुरावे कसे नष्ट करता येतील, यासाठी त्याने थेट एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. आर्या पुरूषोत्तम कदम (17) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून पुरूषोत्तम कदम यांना अटक करण्यात आली.
का केली मुलीची हत्या ?
शनिवारी मध्यरात्री गोडोली येथील घरात टीव्ही पाहणे, मोबाईलचा अतिवापर आणि उद्धट वर्तन यावरून कुटुंबात तीव्र वाद झाला होता. आर्याने रागाच्या भरात तिच्या लहान बहिणीला मारहाण केल्याने घरातील वाद टोकाला गेला. वाद शांत करण्यासाठी आई दोन्ही लहान मुलांना घेऊन बेडरूममध्ये गेली आणि तिने दरवाजा बंद केला. दुसर्या खोलीत आर्या आणि तिचे वडील पुरुषोत्तम कदम गेल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. आर्याने वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी बॅटने तिच्यावर हल्ला केल्याने घाव वर्मी बसून मुलीचा अंत झाला.
हत्येनंतर तीन तास पुरावे नष्ट करण्याची धडपड
मुलीच्या हत्येनंतर आरोपी काही काळ प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत होता. गुन्ह्यातून कसे वाचायचे आणि पोलिसांच्या हाती पुरावे लागू नयेत, यासाठी त्याने सुमारे तीन तास विविध मार्गांचा विचार केला. अखेर त्याने मोबाईलमधील -खचा वापर करण्याचे ठरवले. त्याने एआयला माझ्या हातून नकळत मुलीचा खून झाला आहे, पुरावे कसे नष्ट करू? अशा आशयाचा प्रश्न विचारल्याचे तपासात समोर आले.
एआयने गुन्ह्यात मदत करण्यास दिला नकार
आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच पोलिसांना काय सांगावे, याबाबत एआयकडून मार्गदर्शन मागितले मात्र एआयने अशा प्रकारची मदत देण्यास स्पष्ट नकार दिला. गुन्हेगारी कृत्याला मदत करणारी माहिती देणे शक्य नसल्याचे सांगत, तातडीने पोलिसांना माहिती देण्याचा सल्ला एआयकडून देण्यात आला.
रक्ताने माखलेले कपडे धुतले
एआयकडून मदत न मिळाल्याने आरोपीने स्वतःच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने अंगावरील रक्ताने माखलेला टी-शर्ट काढून वॉशिंग मशीनमध्ये तीन वेळा धुतला. घरातील फरशीवर पडलेले रक्ताचे डागही पुसले. त्यानंतर संपूर्ण घर पाण्याने स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. हत्येसाठी वापरण्यात आलेली रक्ताने माखलेली बॅट त्याने घाईघाईने घराच्या टेरेसवर नेऊन लपवून ठेवली.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट कहाणी
पुरावे नष्ट केल्यानंतर आरोपीने पोलिसांना बोलावले आणि मुलीने घरगुती वादातून स्वतःचे डोके भिंतीवर आपटून घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना त्याच्या कथनावर संशय आला. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता भिंतीवर रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर टेरेसची तपासणी केली असता रक्ताने माखलेली बॅट पोलिसांच्या हाती लागली त्यामुळे हा प्रकार अपघात नसून हत्या असल्याचा संशय अधिक बळावला.


