ट्रक-बसमध्ये अपघात होताच लागली आग : सात प्रवासी जखमी
सुदैवाने काचा फोडून प्रवाशांना पोलिसांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना रोखली
बुलढाणा : प्रवासी घेवून निघालेल्या एस.टी.बस व कोळशाची वाहतूक करणार्या ट्रकमध्ये समोरा-समोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने या घटनेत सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवार, 6 रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेळद फाट्यानजीक झाला. जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी जाणार्या पोलिसांनी वेळीच प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवीतहानी टळली.
अपघातानंतर बस जळून खाक
बुलढाणा आगाराची बुलडाणा-नागपूर ही बस (एम.एच.40 ए.क्यू.6160) ही बुधवारी सकाळी 10.45 वाजता नागपूरसाठी निघाली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास या बसची आणि कोळशाची वाहतूक करणार्या ट्रकची (यु.पी.70 जी.झेड.0515) समोरा-समोर धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर बस व ट्रकने पेट घेतला. या अपघातामध्ये बस जळून खाक झाली. या अपघातामध्ये बसमधील 7 प्रवाश्रही जखमी झाले आहे. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार झाले तर काही किरकोळ जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.दरम्यान, बसने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच निवडणूक निकालाच्या बंदोबस्तासाठी जाणार्या बाळापूर पोलिसांनी तेथे धाव घेत बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.








