बोदवड पोलिस निरीक्षकांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
आमदार चंद्रकांत पाटील यांची माहिती : वरीष्ठांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा दावा
बोदवड : रेतीचे हप्ते दिले नाही म्हणून नगराध्यक्षा मुमताजबी बागवान यांच्या पुतण्यास पोलिस ठाण्यात बोलवून मारहाण केल्याचा प्रकार 12 ऑक्टोबरला रात्री आठ वाजता घडल्याचा आरोप असून या प्रकारानंतर बुधवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी बोदवड शहरात भेट देवून घडला प्रकार जाणूनप घेतला. निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याबाबत वरीष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
रेती हप्त्यावरून वादाची चर्चा
जमील बागवान उर्फ बाबा यास पोलिस ठाण्यात बोलावून ‘तू परस्पर रेतीचे चार हप्ते घेतले, ते मला आणून दिले नाही. ते हप्ते मला तुझी किडनी विकून आणून दे’ असे नगराध्यक्षपती सईद बागवान यांच्यासमोर बोलून पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर नगराध्यक्ष पती यांच्या कार्यालय परीसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमला मात्र आमदारांनी संयम राखण्याचे आवाहन केल्यानंतर जमाव माघारी परतला होता.






आमदारांनी जाणून घेतली परीस्थिती
मंगळवारी घटनेनंतर बुधवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरात भेट दिली. विश्रामगृहात कार्यकर्त्यांनी बोदवड पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या विरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला. याप्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याबाबत वेळोवेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्या. यापूर्वीदेखील निरीक्षकांनी महिलेला मारहाण, महिलांना व कार्यकर्त्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, कुठलेही कारण नसतांना कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचे प्रकार केल्याचा आरोप केला. वरीष्ठांकडे निरीक्षकांबाबत तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेवून याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष पती म्हणाले ; आपल्यासमोर पुतण्याला मारहाण
नगराध्यक्ष पती हाजी सईद बागवान यांनी पोलिस निरीक्षक यांच्यावर आरोप करत सांगितले क, माझ्यासमोर माझ्या पुतण्याला मारहाण करण्यात आली तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. हप्ते वसुलीची भाषा करून आपला अपमान करण्यात आला. काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांनी पोलीस निरीक्षकांवर मनमानी पद्धत्तीने कारभार करीत असल्याचा आरोप केला.
आपल्यावरील आरोप निराधार : राहुल गायकवाड
पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, म्हसोबा मंदिर परीसरातील चौकात जमील बागवान आणि अज्ञात युवकांमध्ये वाद झाल्याने चौकशीसाठी जमील बागवान यांना बोलविण्यात आले. असे असताना माझ्यावर होत असलेले आरोप 100 टक्के खोटे असून राजकीय हेतूने माझ्या विरोधात अनेकांनी खोट्या तक्रारी वरीष्ठांकडे केल्या आहेत. निवडणूक जवळ येत असल्यामुळे ठरवून आरोप करण्यात येत आहे. सिटीटीव्ही फुटेज तपासल्यास मारहाण झाली नसल्याचे स्पष्ट होईल. पोलिस प्रशासनाची नाहक बदनामी सुरू आहे, असेही ते म्हणाले.


