नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचोरा दौरा : राजकीय वर्तुळात खळबळ
निवडक नेते मंडळींसोबत विकासकामांचा आढावा घेतल्याची चर्चा
पाचोरा : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पाचोरा शहराला धावती भेट घेत विकासकामांचा आढावा घेतला. अनपेक्षित झालेल्या या दौर्यात त्यांनी पाचोरा व भडगाव नगर परीषद अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत आगामी पालिकेच्या राजकारणाची माहिती आमदार किशोर पाटील यांच्याकडून जाणून घेतल्याचे समजते. या दौर्याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली.
निवडक मान्यवरांसोबत चर्चा
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळीच हेलिकॉप्टरने जळगाव गाठले. पाचोर्याचे आमदार किशोर पाटील हे त्यांच्या वाहनाने ना.शिंदे यांना घेण्यासाठी पोहचले. शिंदे यांचा हा खाजगी दौरा असल्याने पाचोर्यातील कृष्णापुरी भागात त्यांनी निवडक मान्यवरांनाच भेट दिली. भेटीप्रसंगी पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांच्यासह पाचोर्याचे काही नगरसेवक आणि जळगावचे माजी नगरसेवक अमर जैनदेखील उपस्थित असल्याचे समजते. यावेळी शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीबाबत चर्चा केली.






भगवा फडकवण्यासाठी विचारमंथन
जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी करावयाच्या रणनीतीबाबत त्यांनी गुप्तगू करण्यात आली शिवाय राममंदिर परीसरात एकनाथ शिंदे, आमदार किशोर पाटील व मुकुंद बिल्दिकर या तिघांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी यात विविध राजकीय विषयांवर खलबते झाल्याची माहिती आहे. मंत्री शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत जळगाव महापालिकेतील राजकीय परीस्थितीवर चर्चा केली. स्थानिक नेते मंडळी व पदाधिकार्यांकडून त्यांनी काही सूचनाही ऐकून घेतल्याची माहिती आहे.


