माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंना दिलासा ; आठवडाभर अटकेपासून संरक्षण
मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने एक आठवडा अटकेपासून अंतरीम संरक्षण दिले आहे मात्र या एका आठवड्यात त्यांना विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचया आदेशानंतर गुरुवारी मंदाकिनी खडसे न्यायालयात उपस्थित होत्या.
खडसेंना मुळव्याधीचा त्रास
आपण सध्या प्रकृती अस्वस्थ्यानं त्रस्त असून तूर्तास कोर्टात हजेरी लावू शकत नसल्याचं खडसे यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितले. यावर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयात दाद मागण्यासाठी आठवड्याचा अवधी दिला आहे. न्यायमूर्ती एन.डब्ल्यू.सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसेंच्या पत्नी आणि याप्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे यांनाही हायकोर्टानं ताप्तुरता दिलासा दिला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे. 17 ऑक्टोबर ते 7 डिसेंबरपर्यंत तपास यंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देत याकाळात आठवड्यातून दोनदा, दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे मंदाकिनी खडसेंना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दरम्यानच्या काळात मंदाकिनी खडसे यांना अटक झाल्यास त्यांची 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसेंना मात्र याप्रकरणी कोर्टानं वैद्यकीय कारणास्तव तूर्तास दिलासा दिला आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले.








