धक्कादायक ! : एसीबी कर्मचार्याकडेच मागितली 50 लाखांची खंडणी
रायगड : लाचखोरांना गजाआड करणार्या विभागातील कर्मचार्याकडे 50 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार अलिबागमध्ये घडला. अलिबाग एसीबीच्या कार्यालयात पोलिस हवालदाराला धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्मचार्याकडेच मागितली खंडणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय पिंपळभाट येथे आहे. 17 सप्टेंबर 21 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आरोपीने काहीही काम नसताना प्रवेश करीत संबंधीत पोलिस फिर्यादी यांना मला तुझी नोकरी घालवायची आहे. तुझी सगळी माहिती मी काढली आहे. जमिनीच्या व्यवहारामध्ये एक कोटी रुपये घेतले आहेस. त्यातील मला 50 लाख दे नाही तर तुझी चौकशी करायला लावून कारवाई करायला सांगतो. त्यावर फिर्यादी यांनी मी काय म्हणून पैसे देऊ, मी कोणाकडूनही एवढी मोठी रक्कम घेतलेली नाही. मी एकही पैसा देणार नाही असे सांगितले. याचा राग येऊन आरोपी हा फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी गेला. त्यावेळी तिथे असलेल्या पोलिस कर्मचारी सहकार्याने हस्तक्षेप करुन प्रकरण सोडवले. त्यानंतर शिवीगाळ आणि धमकी देत आरोपी रीक्षातून निघून गेला.








