अपूर्ण घरकुले पूर्ण होण्यात दिरंगाई : कामांना चालना देण्याचे आदेश
रावेर तालुक्यात विविध योजनेचे 566 घरकुले अपूर्ण
रावेर : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गरीबांची घरकुले पूर्ण करण्याचे तसेच गरज पडल्यास गटविकास अधिकार्यांनी स्पॉटवर जावून लाभार्थींच्या तांत्रिक अडचणी सोडविण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी घरकुला संदर्भात रावेर पंचायत समितीत महत्वाची बैठक घेण्यात आली. यामध्ये ग्रामसेवकांकडून घरकुलांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात मागील पाच वर्षांपासून घरकुले अपूर्ण असल्याने जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
घरकुल योजनेला गती देण्याचे आदेश
रावेर पंचायत समितीच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासह घरकुल संदर्भात तांत्रिक अडचणी सोडविणे, लाभार्थींना जागा उपलब्ध करून देणे आदी मुद्यांवर घरकुलाबाबत आढावा घेण्यात आला.विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे, सधांशु आदीच्या उपस्थित सुमारे सहा तास गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी आढावा घेऊन घरकुल योजनेला गती देण्याच्या सूचना केल्या. प्रसंगी तालुक्यातील ग्रामसेवकांची उपस्थिती होती.



घरकुले पूर्ण करण्यात होतेय ढिलाई
रावेर तालुक्यात विविध योजनांची घरकुले पूर्ण करण्यात ढिलाई होत असल्याचा आरोप आहे. गेल्या पाच वर्षांपासून घरकुले तालुक्यात प्रलंबित असून घरकुले पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका झाल्या परंतु काहीही उपयोग झाला नाही.
2016 पासुनचे 566 घरकुले अपूर्ण
रावेर तालुक्यात 2016 पासून घरकुले अपूर्ण असून यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे 271 रमाई घरकुल योजनेची 259 तर शबरी घरकुल योजनेचे 36 लाभार्थी असून एकूण 566 घरकुले विविध योजनेचे रावेर तालुक्यात अपूर्ण आहेत.
