भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या प्राचार्यपदी डॉ.राहुल बारजिभे


भुसावळ : हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह हे आपल्या 21 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी प्राचार्यपदी डॉ.राहुल बारजिभे यांची निवड करण्यात आली. श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पातळीवर पोहोचवण्यासाठी स्व.भैय्याजींनी (डी.डी.शर्मा यांनी) पाहिलेल्या ध्येयाकडे वाटचाल करतांना अभियांत्रिकी शिक्षणविषयीची निष्ठा व जबाबदारी यांचे निस्वार्थपणे पालन करून महाविद्यालयाला नवीन उंचीवर नेण्यासाठी समर्पणाने झोकून देऊन आपल्यासह सहकारी काम करतील, असा आशावाद पदभार घेताना डॉ.बारजिभे यांनी व्यक्त केला.

20 वर्षांपासून अधिक अनुभव
डॉ.राहुल बारजिभे यांना 20 वर्षानहूनही अधिकचा प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव आहे. गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. ते महाराष्ट्र राज्याचे तंत्र विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ , लोणेरे येथे एक्झिक्युटिव कौन्सिल, अ‍ॅकडमिक कौन्सिल, बोर्ड ऑफ एक्सामीनेशन चे सभासद तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे बोर्ड ऑफ स्टडीज चे सभासद अश्या अत्यंत महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. जळगांव येथे तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. तंत्रशास्त्र विद्यापीठात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पारंपरीक विद्यापीठातील महाविद्यालय जोडताना विद्यापीठनिहाय विषयांचे वैविध्य लक्षात घेत त्यांचे तंत्रशास्त्र विद्यापीठात सामिलीकरण करतांना राज्य पातळीवर त्यांनी बजावलेली समन्वयकाची भूमिका कुलगुरू तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाकडून वाखाणली गेली. मेकॅनिकल इंजीनीरिंग मधील व्हायब्रेशन अ‍ॅण्ड अक्कोस्टिक्स हे त्यांच्या विशेष संशोधनाचे विषय आहेत. आठ विद्यार्थ्यांचे पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून ते काम पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र आणि तांत्रिक मासिकांमध्ये 46 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.




पदाधिकार्‍यांनी दिल्या शुभेच्छा
डॉ.बारजिभे यांना निवडीनंतर हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी, डॉ.रवीकांत परदेशी, बिसेनजी अग्रवाल, संजय नाहटा, पंकज संड, संजय जोशी तसेच इतर पदाधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !