कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांचे वेतन पाच महिन्यांपासून रखडले
दिवाळी अंधारात, प्रशासनाचे दूर्लक्ष : वैद्यकीय अधिकारी रखडलेल्या वेतनाच्या प्रतीक्षेत
भुसावळ : कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांचे वेतन पाच महिन्यांपासून रखडले जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणार्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांचे वेतन माहे जून महिन्यापासून मिळाले नाही. गेल्या पाच महिन्यांचे वेतन रखडले आहे. यामुळे या वैद्यकिय अधिकार्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. जिल्हा परीषद आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाभरातील तब्बल 87 वैद्यकीय अधिकारी रखडलेल्या वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात 87 वैद्यकीय अधिकारी कार्यरत
कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर जीवाची बाजी लावून काम करणार्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना जून महिन्यापासून मासिक वेतन मिळाले नाही. जिल्हाभरात असे 87 कंत्राटी वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देत असताना पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने या कंत्राटी वैद्यकिय अधिकार्यांना प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. दिवाळी चार दिवसांवर येवून ठेपल्यावरही या वैद्यकीय अधिकार्यांना रखडलेले पाच महिन्यांचे वेतन देण्यासाठी जिल्हा परीषदेचा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात आमदार संजय सावकारे व भाजप वैद्यकिय आघाडी उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसोबत चर्चा करून या वैद्यकीय कर्मचार्यांना तातडीने वेतन दिले जावे, अशी मागणी केली आहे.



उद्धवा अजब तुझे सरकार..!
एकीकडे महाराष्ट्र शासन कोरोना पर्वात सुयोग्य कार्य केले म्हणून वैद्यकीय अधिकारी वर्गाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारते आणि त्याच वेळी मागील पाच महिने पगार नसल्याने पोटावर लाथ मारते. वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या परीवाराने दिवाळी साजरी करायची नाही का? आमदार संजय सावकारे यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा करणार आणि दिवाळी निश्चितच गोड जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील म्हणाले.
