भुसावळात बायोडिझेलची अवैध विक्री : तिघा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी


भुसावळ : जळगाव गुन्हे शाखेने भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीतील दीपनगरजवळ बायोडिझेलची अवैधरीत्या विक्री करताना तिघा संशयीतांना रंगेहाथ पकडत तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. अटकेतील आरोपींना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मध्यरात्री पोलिसांची धाड
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास वरणगाव महामार्गावरील हॉटेल निर्मल ढाब्याजवळ अवैधरीत्या सुरू असलेल्या बायोडिझेल पंपावर छापा टाकल्यानंतर खळबळ उडाली. पथकाने महेंद्रा कंपनीचे वाहन (जी.जे.11 एक्स.9660), एक लाख 68 हजारांचे दोन हजार लीटर बायोडिझेल, 40 हजार रुपये किंमतीचे दोन डिस्पेन्सर मशीन, 16 हजार रुपये किंमतीची मोटार, केबल वायर तसेच एक लाख 93 हजारांची रोकड मिळून सात लाख 37 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी पंप चालक हितेश वासुदेव शर्मा (24, रा.वरणगाव, ता.भुसावळ), सिकंदर खान इस्माईल खान (50, मिल्लतनगर, भुसावळ) व शेख निसार शेख (19, वरणगाव, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली होती तर संशयीतांविरोधात प्रभारी पुरवठा निरीक्षक विजय पुंडलिक पाटील यांच्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपींना सोमवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !