वरणगावात वीज मीटरमध्ये फेरफार करणार्‍या ग्राहकांवर कारवाई


वरणगाव : शहरात विविध प्रकारे वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने येथील वीज महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी ज्या ग्राहकांचे वीज वापर 30 युनिटपेक्षा कमी असेल त्यांची चौकशी करून कारवाई सुरू करण्यात आल्याने वीज ग्राहकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.

वीज चोरी वाढल्याने मोहिम
शहरात वीज चोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे त्यामुळे वरीष्ठांच्या आदेशाने मंगळवारी ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर 30 युनिटपेक्षा कमी आहे अशा वीज ग्राहकांकडे वरणगाव शहर कक्षातील कक्ष अभियंता डी.आय.पाटील व सहकारी जनमित्र हसन तडवी, शेख सलमान, अमिन शहा, दुर्गेश फेगडे यांनी ग्राहकांची स्थळ तपासणी केली. काही ग्राहकांनी वीज मीटरमध्ये जाणार्‍या वायरला कट करून मीटरमध्ये रेझिस्टंट टाकून वीज मीटर बंद पाडले होते. काही ग्राहकांची वीज जोडणी थकबाकी न भरल्यामुळे त्यांचे कनेक्शन कट केले असल्यामुळे त्यांनी दुसरीकडून वीजपुरवठा जोडून घेतल्याचे आढळून आले. काहींनी वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचेही निदर्शनास आले. अशा एकूण पाच ग्राहकांवर वरणगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता तुषार गाजरे यांच्या मार्गदर्शनात दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !