अहमदनगर दुर्घटनेतील मयताच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत : आरोग्य मंत्र्यांची घोषणा
मुंबई : अहमदनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या चौशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभागाला शनिवारी सकाळी साडेदहा वाजता शार्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात 17 कोवीड रुग्ण दाखल होते. यापैकी दहा रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर एक रुग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली. नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

