फॉरेस्ट विभागात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणाला पाच लाखांचा गंडा
धुळे : फॉरेस्ट विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणाला सुमारे पाच लाखांचा गंडा घालण्यात आला. नोकरी न लागल्याने दोंडाईचा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री फिर्याद दिल्यावरून दिनकर दत्तात्रय कुलकर्णी (सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नोकरीच्या आमिषाने गंडवले
शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथील एका तरुणाला जवळपास पाच लाखांत गंडविल्याचा प्रकार जुलै ते डिसेंबर 2019 या काळात घडला. पैसे देऊन काम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली.
दिलीप खंडेश्वर कुलकर्णी यांचा मुलगा राहुल कुलकर्णी याला वन विभागात नोकरी लावण्याचे आश्वासन सोलापूरच्या दिनकर दत्तात्रय कुलकर्णी (रा. श्रेयसनगर) यांनी दिले होते व त्यापोटी राहुलकडून 14 हजार रुपये रोख आणि त्याच्या आईच्या बँक खात्यातून आरटीजीएसमार्फत चार लाख 49 हजार 500 रुपये असे एकूण चार लाख 63 हजार 500 रुपये दिनकर कुलकर्णी यांना देण्यात आले. त्यानंतर विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळू लागल्याने फसगत झाल्याचे लक्षात येताच दिलीप कुलकर्णी यांनी दोंडाईचा पोलिसात धाव घेतली.


