भुसावळात प्रभाग रचनेच्या आदेशाची प्रतीक्षा
भुसावळ : पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक प्रभाग व तीन सदस्य वाढणार हे 2 नोव्हेंबरच्या अध्यादेशानुसार निश्चित झाले आहे. मात्र अद्यापही निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसंदर्भात पालिकेला सूचना मिळालेल्या नाहीत. यामुळे पालिकेची आगामी निवडणूक प्रक्रिया थंड बस्त्यात आहे. राजकीय वर्तुळात प्रभाग रचनेबाबत उत्सकुता वाढली आहे.
लोकसंख्येच्या निकषांनुसार अध्यादेश
पालिका सदस्य संख्येत 17 टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबरच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. मात्र तो बदलून 2 नोव्हेंबरला लोकसंख्येच्या निकषांनुसार अध्यादेश काढण्यात आला. यानुसार शहरात एक नवीन प्रभाग व तीन नगरसेवक वाढणार आहेत. सध्या 24 प्रभाग असून आगामी निवडणुकीत ते 25 असतील. शेवटच्या प्रभागात इतर प्रभागातील लोकसंख्येपेक्षा अधिक प्रभाग असेल. यात तीन नगरसेवक असतील, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान अध्यादेश निघाल्यानंतर प्रभाग रचनेबाबत स्पष्ट सूचना मिळणे अपेक्षित होते, मात्र याबाबतचे निर्देश अद्यापही पालिकेला प्राप्त झाले नाहीत.


