मध्यप्रदेशातून अवैधरीत्या दारूची वाहतूक : पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर तालुका पोलिसांची महामार्गावर चारणपाडा येथे धडक कारवाई
शिरपूर : मध्यप्रदेश राज्यातून शिरपूरकडे अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणार्या एका वाहनांवर मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील चारणपाडाजवळ शिरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी धडक कारवाई करीत दोन लाख 25 हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठ्यासह एकूण चार लाख 75 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना सोमवार, 15 नोव्हेंबर रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास महामार्गावरील पलासनेर शिवारात चारणपाडाजवळ पोलिसांनी सापळा रचला असता सेंधवाकडून शिरपूरकडे मॅक्स कंपनीची गाडी (एम.एच.22 एम.481) ची तपासणी केल्यानंतर त्यात 25 हजार 200 रुपये किंमतीची चार खोके गोवा व्हिस्की, 62 हजार 400 रुपये किंमतीचे 10 खोके रॉयल सिलेट व्हिस्की व एक लाख 38 हजार रुपये किंमतीची 50 खोके लेमाड बिअर असा दोन लाख 25 हजार 600 रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा आढळून आला तर दोन लाख 50 हजार रुपये किंमतीचे वाहन मिळून एकूण चार लाख 75 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक सनी संजय कलाल (रा.वरवाडे शिवार, शिरपूर) यास ताब्यात घेण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप बाविस्कर करीत आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ, पीएसआय नरेंद्र खैरनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नियात शेख, हवालदार पवन गवळी, कॉन्स्टेबल मुकेश पावरा, नाईक रोहिदास पावरा, चालक हवालदार सईद शेख यांच्या पथकाने केली.

