मुक्ताईनगरात पथनाट्यातून नागरीकांचे प्रबोधन
मुक्ताईनगर : शहरासह मुक्ताईनगर पोलीस हद्दीतील अंतुर्ली व कुर्हा येथे पथनाट्यातून व मूक अभिनयातून नागरीकांचे प्रबोधन करण्यात आले. ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने, समाजसेवक सुमित पंडित यांनी मुख्य भिनयातून तसेच विविध गाण्यांतून जनतेला सतर्कतेचे आवाहन केले. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग राबवण्यात आला.
या विषयांबद्दल जनजागृती
महिलांची होणारी चॅन स्नॅचिंग, पाकीट मारी, दुचाकी-चारचाकी चोरी यापासून कसे सतर्क रहावे? याबाबत जनजागृती करण्यात आली. माणुसकी रुग्णसेवा समूहाची साथ लाभली. मुक्ताईनगर पोलिस स्टेशनपासून कार्यक्रमाची सुरूवात झाली तर तहसील कार्यालयासमोरील प्रवर्तन चौक, अंतुर्ली व कुर्हा गावातील ग्रामस्थांपुढे जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात सावधान दिवाळीच्या सणाला गावी जात आहात तर घरफोड्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी राबवलेली ‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांना सतर्क राहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
पोलीस निरीक्षक राहुल खताळ, गोपनीय कर्मचारी मनुरे, पोलीस कर्मचारी मंगल साळुंके, पोलीस अंमलदार अंकुश बाविस्कर, रवींद्र धनगर, अश्विनी बोदडे, सकु तिगळवाड, सादीक पटवे, गजमल पाटील, रवी चौधरी, सुनील नागरे, पत्रकार कमलाकर माळी व ग्रामस्थ उपस्थित होते. ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित यांनी एकपात्री पथनाट्य सादर केले.
‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’
सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मुक्ताईनगर शहरात घरफोड्या, दरोडे, दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या दुचाक्यांना जीपीआरएस सिस्टम तथा लोखंडी साखळी लावावी तसेच घरातील जास्तीची रोकड बँकेत ठेवावी व ऑनलाईन व्यवहाराला सावधानता बाळगून प्राधान्य द्यावे, आपल्या मोबाईलचा पासवर्ड कोणालाही देऊ नका, सोसायट्या, बंगले, रो हाउस अशा ठिकाणी वॉचमन वा सुरक्षारक्षक नेमावेत तसेच सीसीटीव्ही बसवावेत तसेच आपला शेजारी आपला खरा पहारेकरी असतो, असे निरीक्षक राहुल खताळ म्हणाले.


