बोदवड शहरात रामानुजन अमृत भारत यात्रेचे स्वागत
बोदवड : भारतीय स्वातंत्र्याची 75 वी जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरूनच रामानुजन अमृत भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात राज्याच्या सोमनाथ जिल्ह्यापासून 2 ऑक्टोंबर 2021 पासून ही यात्रा सुरू झाली व 22 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय गणित दिनर त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथे या यात्रेची समाप्ती होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मोजक्या शाळेची निवड यात्रेच्या स्वागतासाठी करण्यात आली. त्यात न.ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवड येथे या यात्रेचे शनिवारी स्वागत करण्यात आले.
यांचा यात्रेत सहभाग
शाळेपासून पाचशे मीटर अंतरावरील महात्मा फुले चौकापासून शालेय बँड पथक, एनसीसी, आर.एस.पी पथकाने या यात्रेचे वाजत-गाजत स्वागत केले. या यात्रेत मॅथगुरू ऑफ इंडिया बी.एन.राव, इस्त्रोचे माजमी वैज्ञानिक डॉ.जयंत जोशी, गणितज्ज्ञ डॉ.चंद्रमौली जोशी, प्रशिक्षक मेहुल हर्षला, ब्रजेश दीक्षीत, किशोर राजे, नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, स्टेट कन्व्हेनर सुनील वानखेडे, होमी बाबा रिसर्च सेंटरचे डीन सुधाकर आगरकर व जिल्ह्यातील गणित प्रेमी शिक्षकांचा यात समावेश होता. स्वागत समारंभाचा कार्यक्रम भास्कराचार्य सभामंडपात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक एन.ए.पाटील यांनी केले. संस्थेचे ज्येष्ठ संचालक अॅड.प्रकाशचंद जी सुराणा यांनी गणित तज्ञांना व्हायब्रेटची उपमा दिली. सचिव विकास कोटेचा यांनी गणित यात्रा आपल्या गावात आली हे आपले भाग्यच असल्याचे सांगितले. मंगळ यान व चंद्र यान यांच्या पाया रचनेत सहभागी असलेले डॉ. जयंत जोशी यांनी संशोधन व गणिताचा संबंध यातील विविध उदाहरणे दिली. होमी बाबा रीसर्च डीन सुधाकर आगरकर यांनी गणित व सर्व विषयांचा किती जवळचा संबंध आहे हे मनोगतातून स्पष्ट केले. चेअरमन मिठूलाल अग्रवाल यांनी आपल्या आवडीच्या विषयाची यात्रा आपल्या शाळेत आल्याने आपले जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. मेहुल कुमार हरसोला यांनी विद्यार्थ्यांची एक तासाची कार्यशाळा घेतली. गणितज्ञ डी.आर.कापरेकर सभागृहात भारताचे मॅथ गुरु गणित तज्ज्ञ बी.एन.राव यांनी शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतली. उत्सव समिती प्रमुख पी.बी.नरवाडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.व्ही.व्ही.सिसोदे व निशांत महाजन यांनी केले. दीपक चौधरी यांनी आभार मानपले. यशस्वीतेसाठी शाळेतील उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य,पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परीश्रम घेतले.


