चोपडा फाट्यावर अपघात : भरधाव दुचाकी घसरल्याने तरुण जागीच ठार ; एक जखमी
शिरपूर : शहरातून दुचाकीने नागेश्वर बंगल्याकडे निघालेल्या दुचाकीस्वारांचे वाहन अजंदे शिवारातील चोपडा फाट्यावर घसरून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. किरण मच्छिंद्र नगराळे असे मयताचे नाव आहे.
दुचाकी घसरून अपघात
शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला येथील किरण मच्छिंद्र नगराळे व शांताराम सोमा ठेलारी हे गुरुवारी शहरात आले असता सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नागेश्वर बंगला गावी परत जात असताना तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गाजवळ अजंदे शिवारात चोपडा फाट्यावर दुचाकी घसरल्याने किरण मच्छिंद्र नगराळे जागीच ठार झाला तर शांताराम सोमा ठेलारी हा जखमी झाला. मयत व जखमीस महामार्ग अम्ब्युलन्सने शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.हिरेन पवार यांनी किरण मच्छींद्र नगराळे यास तपासणी करून मयत घोषित केले तर शांताराम सोमा ठेलारी याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वॉर्डबॉय नितेश गवळी यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून वाहन अपघात व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


