अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
प्रयागराजमधील घटना : 11 लोकांविरोधात गुन्हा दाखल
लखनऊ : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये उघडकीस आली. मृतांमध्ये 16 वर्षीय मुलगी आणि तिच्या 10 वर्षीय भावाचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे चोरट्यांनी ही हत्या केली. दरम्यान, नातेवाईकांनी मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येसह इतर कलमांतर्गत 11 नामांकित लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी काही लोकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
धारदार शस्त्राने वार करीत हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या शरीरावर कुर्हाडीचे घाव घातलेल्या गंभीर जखमांच्या खुणा आहेत. तसेच, मुलीचा मृतदेह घरातील एका खोलीत आणि इतर तीन मृतदेह अंगणात एकत्र आढळून आले आहेत. पीडित कुटुंबातील एका सदस्याने मीडियाला सांगितले की, मृत कुटुंबाचा शेजारच्या उच्च जातीच्या कुटुंबाशी 2019 पासून जमिनीचा वाद सुरू होता. 2019 मध्येही त्या कुटुंबाकडून हल्ला झाला होता, पण तेव्हा तो वाद मिटवण्यात आला. आता त्या अँगलने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



