फैजपूरात त्या एटीएममधील दहा लाखांच्या नोटा जळाल्या
35 लाखांची रोकड सुरक्षित : पोलिसांकडून आता चोरट्यांचा शोध
फैजपूर : शहरातील यावल रोडवरील दुध शीतकरण केंद्राजवळील भारतीय स्टेट बँकेचे बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला होता मात्र सुदैवाने चोरट्यांना एटीएम फोडता न आल्याने एटीएममधील सुमारे 45 लाखांची रोकड बचावली होती. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केल्याने एटीएमचे डिजिटल लॉक खराब झाल्यानंतर दिल्लीहून टेक्नीशीयनला पाचारण करण्यात आल्यानंतर सोमवारी पोलिस बंदोबस्तात एटीएम मशीन उघडण्यात आले असता त्यात 35 लाखांची रोकड सुरक्षीत आढळली मात्र दहा लाख 84 हजारांच्या नोटा जळाल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांनी रीतसर पंचनामा केला आहे.
आता चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन
फैजपूर पोलीस ठाण्यात एटीएम फोडून मशीनचे नुकसान केल्याप्रकरणी सीएमएस कंपनीचे एटीएम मॅनेजर आदेश विजय अहिरे (27, जेलरोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह जिल्ह्यात अशा पद्धत्तीने करण्यात आलेल्या गुन्ह्यांतील संशयीतांची माहिती पोलिसांकडून आता काढली जात आहे.
दहा लाखांची रोकड जळाली
अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडताना सीसीटीव्हीवर स्प्रे मारला होता शिवाय एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याने एटीएम मशीनला आग लागल्याने शनिवारी पहाटे चोरट्यांचा प्रयत्न असफल होताच चोरट्यांनी धूम ठोकली होती. या प्रकारात एटीएमचे डिजिटल लॉक नादुरुस्त झाल्यानंतर दिल्लीहून कंपनीच्या टेक्नीशीयनला सोमवारी पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्तात एटीएम उघडल्यानंतर त्यातील दहा लाख 84 हजारांच्या नोटा अर्धवट जळाल्याच्या आढळल्या तर 35 लाखांची रोकड मात्र सुरक्षीतरीत्या आढळल्याने बँक प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला. गॅस कटरचा वापर झाल्याने व उष्णतेमुळे आग लागून या नोटा जळाल्या आहेत दरम्यान, अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहेत.




