कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर तत्काळ नियुक्ती द्या

जिल्ह्यातील खाजगी संस्थाचालकांची जुक्टो संघटनेतील सदस्य घेणार भेट


भुसावळ : कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शासन निर्णयानुसार तत्काळ नियुक्ती द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या जिल्हा कार्यकारीणीची बैठक सुनील सोनार यांच्या अध्यक्षतेखाली नंदिनीबाई बेंडाळे महाविद्यालयात झाली. गत दोन वर्षात मृत्यू पावलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अध्यक्षपदी प्रा.नंदन वळींकर यांची निवड
मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करून पुढील 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पूर्वी ठरल्याप्रमाणे एक वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून प्रा.नंदन वळीकर, कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे, प्रा.सुनील पाटील व सेक्रेटरी म्हणून प्रा.सुनील सोनार यांची निवड एकमताने करण्यात आली.

विविध मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचा निर्धार
सन 2013 ते 2020 पर्यंतच्या कनिष्ठ महाविद्यालयीन मान्यताप्राप्त प्राध्यापकांच्या थकीत वेतन बाबतीत वेतन पथक कार्यालयाने शासनाकडून अनुदानाची मागणी करावी तसेच प्रलंबित असणार्‍या वैद्यकीय बिलाच्या प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून अनुदानाची मागणी करावी, त्याचबरोबर अजेंड्यावरील प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा कार्यकारीणीच्या सदस्यांनी केली. विषय पत्रिकेनुसार अनुदानित व अंशतः अनुदानित कनिष्ठ प्राध्यापकांच्या सेवा सात्यता व शालार्थ क्रमांक उपसंचालकांनी तत्काळ उपलब्ध करुन द्याव्यात, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन राष्ट्रीय बँकेतून व्हावे, वरीष्ठ व निवड श्रेणीसाठी शासनाने दहा दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यात त्यांनी प्रशिक्षणाची फी दोन हजार रुपये करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला विरोध करून प्रशिक्षण मोफत दिले जावे असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला तसेच मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना शासन निर्णयानुसार खाजगी शिक्षण संस्थाचालकांनी अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नियुक्ती देण्याबाबत सर्व कार्यकारिणी सदस्यांनी संस्थाचालकांना सामूहिकरीत्या भेटण्याचा निर्णय घेतला.

आदींची बैठकीला उपस्थिती
या सर्व प्रश्नांवर प्रा.सुनील गरुड, नंदनवन वळीकर, प्रा.सुनील सोनार, डी.डी.पाटील, शैलेश राणे, प्रा.सुनील पाटील, प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.पी.पाटील यांनी सहभाग घेऊन सविस्तर चर्चा केली. कार्यकारी सभेला उपाध्यक्ष प्रा.गजानन वंजारी, प्रा.अतुल इंगळे, प्रा.पी.पी.पाटील, जितेंद्र पाटील, प्रा.राजेश, प्रा.डी.जे.चिकटे, प्रा.बी.एस.बोरसे, प्रा.संदीप पाटील, प्रा.अनिल सोनवणे, प्रा.सुरेखा पवार, प्रा.आर.एस.कोष्टी आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !