बोहर्डीजवळ अपघात : नवरदेवाच्या कारच्या धडकेत दाम्पत्यासह तिघे जखमी
वरणगाव : राष्ट्रीय महामार्गावर बोहर्डी गावाजवळ नवरदेवाला घेवून जाणार्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. त्यात पती, पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजता निर्मल हॉटेलसमोर घडली. पती-पत्नी दोघांना उपचारासाठी जळगावला हलवले. मुक्ताईनगरकडून येणार्या (एम.पी.63 सी.3156) या क्रमांकाच्या कारचा चालक हरुण मुश्ताक शेख (25, रा.बर्हाणपूर) हा नवरदेवाला भुसावळ येथे घेवून जात असताना बोहर्डी गावाजवळ दुचाकी (एम.एच.19 एक्स.2195) वरून महेंद्र दामोदर भंगाळे (45), त्यांची पत्नी गायत्री व मुलगी मानसी (रा.खिर्डी खुर्द, ता.रावेर) हे बोहर्डीजवळ महामार्ग ओलांडत होते. यावेळी मागून येणार्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली मात्र पती, पत्नी दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून जळगावच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. वरणगाव पोलिसांनी कार चालक हारुण शेख याला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.


