यावलला विस्तारीत भागात चार बंद घरे फोडली
पोलिसांकडून पाहणी : 25 हजारांच्या रोकडसह 15 हजारांचे दागिने लंपास : बंद घरांना चोरट्यांनी केले टार्गेट
यावल : घर बंद असल्याची संधी आयतीच चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली व शहरातील विस्तारीत भागातील तब्बल चार घरे फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. चोरट्यांकडून दिवसा रेकी केली जात असावी व रात्री घरफोडी होत असावी, असा संशय आहे. पोलिसांनी विस्तारीत भागात गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. घरफोडीनंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
विस्तारीत भागात चार घरे फोडली
यावल शहरातील फैजपूर रस्त्याला लागुन विस्तारीत भाग असून या भागात पांडुरंग सराफ नगर आहे. या वस्तीतील रहिवासी तथा वनविभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर सपकाळे, हमीद जबरा तडवी, पाल येथे वन विभागातील सेवेत कार्यरत सारीका कदम व आकीब खान साबीर खान हे चारही कुटुंब बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांना मिळाली. गुरूवारी मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याची भीती असून शुक्रवारी दुपारी कुटुंबातील सदस्य घरी आल्यानंतर घरफोडीची बाब उघडकीस आली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनास्थळी यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले पथकासह दाखल झाले. या चारही बंद घरातून नेमका किती रुपयांचा ऐजव गेला याबाबतची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. काही कुटुंबातील लोकं अद्याप घरी परत आलेले नसल्याने कितीची घरफोडी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आकीत खान यांच्या घरातुन 25 हजार रुपयांची रोकड तर हमीद जबरा तडवी यांच्या घरातून 15 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. दोन संबधीत कुटुंबातील सदस्य घरी आल्यानंतर नेमका काय ऐवज चोरीला गेला? याबाबत माहिती कळणार आहे.


