आडगावातील बाबा महाहंस यांना फसवणूक प्रकरणी अटक


यावल : आडगाव येथील बाबा महाहंस यांच्याविरूध्द खोटे दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर यावल पोलिसांनी शुक्रवारी महाराजांना थेट यावल न्यायालयाच्या आवारातुन ताब्यात घेतल्यानंतर खळबळ उडाली. धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेल्या ग्रामपंचायतीचा उतार्‍याची नोंद रद्द करण्यात आल्याने आता धर्मादाय आयुक्त पुढील कारवाईबाबत काय भूमिका घेतात ? याकडे लक्ष लागले आहे. सुड बुध्दीने ही कारवाई करण्यात आल्याचा दावा महाराजांनी केला आहे.

बनावट दस्तावेजाद्वारे दिशाभूल
सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर सेवा प्रतिष्ठान, आडगाव यांच्या मंदिराची जागा ही जागा वनविभाग कक्ष न. 149 गट न. 353 मध्ये 0.24 आर. इतकी आहे. ही जागा ही वनविभागाची मालकीची आहे व असे असतांना गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मार्तंड पाटील उर्फ बाबा महाहंसजी महाराज (आडगाव) यांनी 2015 पासुन वन विभागाची ही जागा असल्याचे माहित असताना सुध्दा ही जागा ही वनविभागाच्या कक्षात येत नाही, असे भासवत बनावट दस्तावेज तयार केले तसेच सेवा प्रतिष्ठान संस्थेचे मंदिर नाही, असे दाखवुन त्या बनावट दस्तऐवजावरून धर्मदाय आयुक्तांकडे मनुदेवी चॅरीटेबल ट्रस्ट या नावाने ट्रस्ट स्थापन करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या कामी त्यांनी स्वत: खोटे प्रतिक्षापत्र सादर करीत ग्रामपंचायतीच्या नमुना 8 वर वनविभागाच्या जागेची नोंद केली. गुरूवारी रात्री बाबा महाहंस महाराज यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक जितेंद्र खैरणार करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !