भुसावळ ग्रामीण रुग्णालयाला मिळाले पाच ड्युरा सिलिंडर
भुसावळ : कोरोनाच्या तिसर्या लाटेची भीती पाहता शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरसाठी ऑक्सिजनचे पाच ड्युरा सिलिंडर प्राप्त झाले आहेत. तिसर्या लाटेची शक्यता पाहता ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण व ट्रॉमा केअर सेंटर मिळून एकूण 100 बेड उपलब्ध आहे. यापैकी 40 बेडला ऑक्सिजन पुरवठ्याची सोय आहे. सोमवारी ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन साठवणुकीसाठी पाच ड्युरा सिलिंडर मिळाले. यापूर्वी येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्रकल्पाचे काम सुरू आहे. आवश्यकतेनुसार सौम्य व मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे पूर्वीप्रमाणे अधिग्रहण करता येणार आहे. मात्र, रुग्ण संख्या किती प्रमाणात वाढेल? याचा अंदाज घेवून हा निर्णय घेतला जाईल. तूर्त तरी कोविडचे रुग्ण वाढल्यास 40 बेड सज्ज ठेवल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी यांनी दिली.


