कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करीत मृतदेह जंगलात पुरला
उत्तरप्रदेश : 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह आढळला मात्र पतीनेच पत्नीची हत्या करून जंगलात मृतदेह पुरल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी सासू आणि सासरे यांना बुधवारी अटक केली. सोनभद्र परीसरात एका महिलेचा सांगाडा सापडल्यानं खळबळ उडाली होती. हा सांगाडा सोनभद्र शहरातील अनपरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सापडला आहे. मृत महिलेचे नाव शुगिया (28) तर बबलू असं या महिलेच्या पतीचे नाव आहे.
पती-पत्नीत झाले होते भांडण
अनपरा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक श्रीकांत राय यांनी सांगितले की, 3 नोव्हेंबर रोजी सिदहवां निवासी बबलू केवट आणि त्याची पत्नी शुगिया (28) यांच्यात भांडण झाले होते. माहिती मिळताच शुगियाचे कुटुंबीय सिदहवां येथे पोहोचले. दोन्ही बाजूंनी पंचायत झाल्यानंतर मुलीची समजूत घातल्यानंतर, सकाळी पुन्हा येतो, असे सांगून माहेरची लोकं रात्री नऊ वाजता आपल्या घरी निघून गेले.




कुटुंबीयांनी गुन्हाही दाखल केला
सकाळी पुन्हा सिदहवां येथे पोहोचल्यावर बबलूने आपली मुलगी पळून गेल्याचे सांगितले. एका आठवड्यानंतर, बबलू स्वत: अनपरा पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या तीन मुलांच्या संगोपनाचा हवाला देत पत्नीच्या हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आई-वडिलांनीही सून आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. दोन्ही पक्षांचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस तपासात गुंतले होते. दरम्यान, मंगळवारी एका ठिकाणी महिलेचे काही कपडे पडलेले आढळून आले. तेथून निघणार्या दुर्गंधीच्या आधारे पोलिसांनी तेथे खोदकाम केले असता, तेथून महिलेचा सांगाडा सापडला. जप्त केलेले कपडे कुटुंबीयांनी शुगियाचे असल्याचं सांगितले.
नातेवाईकांच्या सांगण्यावरून पुरला मृतदेह
मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीमुळे शुगियाचा मृत्यू झाल्याचे पतीने सांगितले. नंतर नातेवाईकांच्या सांगण्यावरून मृतदेह जंगलात नेऊन रात्रीच पुरला. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी मारहाणीत वापरलेली काठीही जप्त केली आहे. मृताच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती बबलू केवट, सासरा रामधेन आणि सासू मनबसिया यांना सायंकाळी उशिरा अटक करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.