राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेरच्या खेळाडूंनी पटकावली 24 पदके
रावेर : मलकापूर येथे नुकत्याच झालेल्या 73 व्या पुरुष, 36 व्या महिला वरीष्ठ गट, 74 व्या पुरुष तसेच 37 व्या महिला कनिष्ठ गट, अठराव्या मुले/मुली युथ गटातील राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करीत 13 सुवर्ण, सात रौप्य, चार कांस्य पदकांची लयलूट केली. युथ ज्युनिअर व सिनियर या गटांची जनरल चॅम्पियनशिप पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व अबाधित ठेवले.
वेटलिफ्टिंग क्षेत्रात दबदबा कायम
जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू उदय महाजन व किरण मराठे यांना स्पर्धेतील बेस्ट लिफ्टर अॅवार्डने सन्मानीत केले. राज्यस्तरीय स्पर्धेत सलग 14 वेळा जेते/उपविजेते पद पटकावून जळगाव जिल्हा संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात वेटलिफ्टिंग क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे.
यांनी पटकावले पदक
युथ गटात 49 किलो गटात तुषार रवींद्र महाजन (सुवर्ण पदक), 55 किलो गटात उज्वल राजेंद्र महाजन (सुवर्ण पदक), 67 किलो गटात प्रणित निलेश महाजन (सुवर्णपदक), 73 किलो गटात मयूर दिलीप बारी (सुवर्णपदक), 73 किलो गटात प्रथमेश कैलास चौधरी (रौप्यपदक), 81 किलो गटात दिनेश विनोद महाजन (सुवर्णपदक), 81 किलो गटात आकाश राजेश शिंदे (कांस्य पदक), 89 किलो गटात निखील गणेश महाजन (रौप्य पदक), 102 किलो गटात नेत्रांजन नीळकंठ पाटील (सुवर्णपदक) पटकावले.
ज्युनिअर सिनियर गट
55 किलो गटात उदय अनिल महाजन (सुवर्णपदक, बेस्ट लिफ्टर अवार्ड), 61 किलो गटात गोविंदा सुनील महाजन (कास्य पदक), 67 किलो गटात अभिषेक गणेश महाजन (सुवर्ण/रौप्य पदक), 73 किलो गटात रवींद्र मराठे (डबल सुवर्णपदक, बेस्ट लिफ्टर अवॉर्ड), 81 किलो गटात दुर्गेश सुनील महाजन (सुवर्ण/कास्य पदक), 89 किलो गटात तेजस रमेश रणसिंगे (कांस्य/कांस्य पदक), 89 किलो गटात पंकज राजेश महाजन (रौप्यपदक), 96 किलो गटात मनीष कैलास महाजन (रौप्यपदक), 109 किलो गटात विष्णू कैलास भोई (सुवर्णपदक) पटकावले. दरम्यान, विजयी खेळाडूंचे जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मुजूमदार, संजय मिसर, प्रदीप मिसर, राजेश शिंदे, प्रमोद महाजन, प्रकाश बेलकर, यशवंत महाजन यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक अजय महाजन, युवराज माळी, संदीप महाजन, नितीन महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करणार : महाजन
फैजपूर पोलिस स्टेशनला कार्यरत जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे मुख्य प्रशिक्षक योगेश महाजन यांनी सांगितले की, विजय खेळाडूंपैकी बरेचसे खेळाडू हे यापूर्वी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू आहेत व ओरीसा भुवनेश्वर येथे होणार्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतदेखील पदक मिळतील, असा विश्वास व्यक्त करीत फैजपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर हे करीत असलेल्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले. भविष्यात रावेरचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळतीलच, अशी खात्री असल्याचे सांगितले.


