सावदा पालिकेचे नवीन सभागृह लेवा समाजाकडे हस्तांतरीत करण्याची मागणी


सावदा : सावदा नगरपालिकेने कोचूर रोडवर असलेल्या पालिकेच्या मालकीच्या सभागृहामागे पश्चिमेस असलेल्या गट क्रमांक 649/650 मध्ये नवीन सभागृह बांधले असून हे सभागृह आता लग्नतिथी असल्याने लवकर सुरू करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान, ही जागा लेवा पाटीदार समाजाने मागितली होती मात्र सभागृह बांधण्यात आल्याने ते समाजाकडे हस्तांतरीत करण्याचा ठराव मंजूर करावा व सभागृहा लेवा समाजाकडे त्वरीत हस्तांतरीत करावे, अशी मागणी आता एका निवेदनाव्दारे करण्यात आली.

लेवा समाजास सभागृह देण्याबाबत चर्चा
संबंधित जागेपैकी 20 आर. जागा लेवा समाजास देण्यात आली होती मात्र या नंतर 19 ऑगस्ट 2014 च्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गट क्रमांक 649/650 वर सभागृह बांधण्याच्या विषयावर मोठी चर्चा झाली व शेवटी या जागेवर पालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सभागृह बांधावे व ते लेवा समाजास हस्तांतरीत करावे, असे ठरले. हे सभागृह लेवा समाजास हस्तांतरीत झाल्यावर त्या 20 आर जागेवर लेवा समाजाचा हक्क राहणार नाही, असे ठरले यावर सूचक म्हणून विद्यमान नगरसेवक राजेंद्र चौधरी तर अनुमोदक म्हणून स्व.नगरसेवक प्रभाकर महाजन होते. यानंतर सभागृह बांधण्यात आले आहे व आता ते खुले करून ठरावानुसार लेवा समाजाकडे देण्याची मागणी एका निवेदनाव्दारे करण्यात आली.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
या निवेदनावर शरद भारंबे, महेश भारंबे, भरत नेहेते, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, सागर पाटील, शाम पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी, जळगाव, प्रांताधिकारी फैजपूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !