वरणगावातील महात्मा गांधी विद्यालयाच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश
संचालकांच्या तक्रारीची दखल : जळगाव शिक्षणाधिकार्यांच्या आदेशाने खळबळ
वरणगाव : दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी, वरणगाव तालुका भुसावळद्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरणगावच्या अध्यक्षा व शाळा समिती चेअरमन आणि तत्कालीन मुख्याध्यापक यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याबाबतचे आदेश जळगाव शिक्षणाधिकार्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
संस्थेच्या संचालकांनी केली तक्रार
वरणगाव परीसरातील नावलौकिक प्राप्त शैक्षणिक संस्था दि वरणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय या शाळेचे शाळा समिती चेअरमन चंदकांत बढे यांच्या गैर कारभाराबाबत संस्थेच्या संचालकांनी संस्थाध्यक्ष वंदना पाटील व संस्था सचिव चंद्रशेखर झोपे यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज केले होते. शाळेच्या आर्थिक व्यवहाराची माहिती संचालकांना अध्यक्षा/सचिव यांच्याकडून दिली जात नव्हती म्हणून माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मुख्याध्यापक यांच्याकडून माहिती घेण्यात आली असता मुख्याध्यापक यांच्याकडून अपूर्ण माहिती मिळाल्याने संस्था संचालकांना शिक्षणाधिकारी, जळगाव व राज्य माहिती आयोग, खंडपीठ, नाशिक यांच्याकडे अपील दाखल करावे लागले. माहिती अधिकारात मिळालेली माहिती व शाळेच्या लेखा परीक्षण अहवाल यातील माहितीवरून वेतनेतर शासकीय अनुदान आणि विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या शाळेच्या पैशांचा बेकायदेशीर वापर व अपहार करण्यात आला असल्याचे संचालकांना लक्षात आल्याने संचालकांनी अध्यक्षा, शाळा समिती चेअरमन आणि तत्कालीन मुख्याध्यापक यांच्याकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत मुद्देनिहाय, दिनांकानुसार व रकमांसह सविस्तर माहिती असलेला तक्रार अर्ज देऊन त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी 27 जुलै 2021 रोजी जळगाव शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांकडे केलेली होती. त्याची दखल घेऊन शाळेच्या गैरकारभाराची व वेतनेतर शासकीय अनुदानाच्या अपहाराची चौकशी करण्याचे आदेश जळगाव शिक्षणाधिकारी यांनी 29 नोव्हेंबर रोजी दिलेल आहेत. संस्थाध्यक्षा, शाळा समिती चेअरमन आणि तत्कालीन मुख्याध्यापक यांच्या चौकशीचे आदेश काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.


