मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकातील चबुतर्याची दुरुस्ती : चौघांना अटक
मुक्ताईनगर : शहरातील प्रवर्तन चौकातील महापुरूषांच्या पुतळा असलेल्या परीसरातील चबुतर्याला गुरांची वाहतूक करणार्या ट्रकने धडक दिल्यानंतर रविवारी रात्री शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांनी संयमांनी परीस्थिती हातातळ मध्यरात्रीच तसेच सोमवारी सकाळी चबुतर्याचे काम पूर्ण केले तर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ट्रकमधील 40 गुरांची सुटका करीत त्यांची गो शाळेत रवानगी करण्यात आली आहे.
चबुतर्याला धडकेमुळे शहरात तणाव
मध्यप्रदेशातील बर्हाणपूरकडून मुक्ताईनगरकडे निघालेला ट्रक (एम.पी.09 एच.जी.9666) मधून कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक केली जात होती व या ट्रकने रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दरम्यान मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात असलेल्या महापुरूषांच्या चबुतर्याला धडक दिल्याने मोठे नुकसान झाले होते. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. सुदैवाने या अपघातात दुचाकीवरून जाणारे लहान मुलीसह तिचे वडील बचावले होते. अपघातानंतर ट्रक चालकाने आपला जीव मुठीत घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर वातावरण संतप्त झाले होते मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्यासह पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे तसेच जिल्ह्यावरून मोठ्या प्रमाणावर कुमक बोलावल्यानंतर वातावरण निवळले होते.



