केळीपट्ट्यात पोटॅश व मिश्र खतांचा तुटवडा : रॅकच्या मागणीसाठी रावेर ऍग्रो असोसिएशनचे निवेदन


रावेर : गेल्या महिनाभरापासून तालुक्यासह परीसरात रब्बीसाठी गहू, हरभरा, मका, कांदा व मुख्य पीक असलेल्या केळीसाठी रासायनिक खतांपैकी डीएपी, 10-26-26, पोटॅश या प्रमुख खतांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. याबाबत रावेर अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनतर्फे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांना निवेदनाद्वारे तालुक्यासाठी पोटॅशची वाढीव मागणी करावी, अशी मागणी केली.

खतांची तीव्र टंचाई
रावेर तालुक्यात केळी निसवण सुरू असून पोटॅशचा मोठा तुटवडा आहे.असे असतांना रासायनिक खत कंपन्यांकडून जिल्ह्यात रासायनिक खतांचा रॅक येत नसल्याने सर्व शेतकरी पोटॅश व डीएपीसाठी वणवण फिरत आहेत मात्र रॅकच नसल्याने कृषी विक्रेते हतबल झाले आहेत. जिल्ह्यात रावेर व यावल तालुका केळी उत्पादनात अग्रेसर असून तालुक्यात पोटॅशची मागणी मोठी आहे. त्या अनुषंगाने विक्रेत्यांना पोटॅशची स्पेशल रॅक उपलब्ध करून द्यावी किंवा जास्तीत-जास्त पुरवठा रावेर तालुक्याला द्यावा, अशी आग्रहाची विनंती असोसिएशनतर्फे कोंडे यांनी केली. दिलेल्या निवेदनाची प्रत खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक, माफदाचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनाही देण्यात आले.

पोटॅशची मागणी : सुनील कोंडे
सद्यस्थितीत केळीपट्ट्यात केळी निसवत असल्याने पोटॅशची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून वेळेवर पोटॅश केळी बागेला न दिल्यास त्याचा उत्पादकतेवर मोठा परीणाम होईल. त्यासाठी तातडीने पोटॅश उपलब्ध होण्यासाठी मागणी केल्याचे रावेर अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे म्हणाले. दरम्यान, रावेर तालुक्याची पोटॅशची आवश्यकता पाहता सोमवारी पोटॅश उत्पादक कंपन्यांची बैठक बोलावली असल्याचे कृषी बिकास अधिकारी वैभव शिंदे यांनी रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनला कळविले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !